लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने नूतनीकरणासाठी महाकवी कालिदास कलामंदिर येत्या १५ जुलैपासून वर्षभराकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेना-भाजपाच्या कार्यक्रमावरून वाक्युद्ध सुरू झाले असताना आयुक्तांनी नूतनीकरणाच्या ई-शुभारंभाचा कार्यक्रमही कालिदासऐवजी अन्यत्र आयोजित करण्याचा निर्णय घेत सेना-भाजपातील वादावरही पडदा टाकला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार, येत्या १६ जुलैपासून महाकवी कालिदास कलामंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दि. १६ रोजी शिवसेनेच्या वाहतूक सेनेने कालिदास कलामंदिरची मागणी केल्याने पेच निर्माण झाला होता. शिवाय, १५ जुलै रोजी शहरातील रंगकर्मी नूतनीकरणापूर्वी अखेरच्या दिवशी कालिदासला अभिवादन करणार असल्याने नंतर पुन्हा दुसरा कोणताही कार्यक्रम घेण्यात येऊ नये, अशी भावना रंगकर्मींमधून व्यक्त केली जात होती. रंगकर्मींच्या या भावनांचा आदर राखत नंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी माघार घेत वाहतूक सेनेचा कार्यक्रम अन्यत्र घेण्याची तयारी दर्शविली. शिवसेना बॅकफूटवर आली असताना सत्ताधारी भाजपा मात्र, दि. १७ जुलै रोजी नूतनीकरणाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या तयारीत गुंतली आहे. त्यामुळे कालिदासमध्ये भाजपाचा कार्यक्रम घेण्यास शिवसेनेने हरकत घेतली. या साऱ्या वादामुळे कालिदासचे नूतनीकरण लांबण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीच आता या वादावर पडदा टाकला असून, कालिदास कलामंदिर येत्या १६ जुलैपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कालिदास नूतनीकरणाच्या कामाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असून, सदर कार्यक्रमाची तारीख निश्चित नाही. मात्र, आता ई-शुभारंभाचा कार्यक्रम मनपाच्या अभिलेख कक्षात अथवा मविप्रच्या थोरात सभागृहात आयोजित करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सेना-भाजपाच नव्हे तर अन्य कुणालाही कालिदास १६ जुलैपासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे.शनिवारी अखेरचा नाट्यप्रयोगमहाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण तब्बल २९ वर्षांनंतर होत आहे. या नूतनीकरणानंतर कालिदासचे रूपडे बदलणार आहे. त्यामुळे स्थानिक रंगकर्मींनी कालिदासला अभिवादन करण्यासाठी रात्री ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. त्यानंतर वर्षभरासाठी कालिदासचा पडदा पडणार आहे.
सेना-भाजपा वादावर आयुक्तांनी टाकला पडदा
By admin | Published: July 11, 2017 12:37 AM