ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 6 - गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त आणि बारामाही नैसर्गिकरीत्या प्रवाहित ठेवण्यासाठी गोदावरीच्या उपनद्या, नैसर्गिक नाले आणि प्राचीन सोळा कुंड पुनर्जीवित करण्याचे आदेश एका जनहित याचिकेच्या निकालात मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. या निकालानुसार याचिकाकर्ता देवांग जानी यांनी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांची भेट घेऊन याबाबत लक्ष वेधले होते. त्यानुसार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचा मानवी वसाहतींशी संबंध या विषयावर संशोधन करणाऱ्या नाशिकच्या अभ्यासक वास्तुविशारद डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी गोदावरी पुनर्जीवित करण्यासाठी भुगर्भशास्त्रानुसार उपाययोजनांचा अहवाल तयार केला. सदर अहवाल व त्याआधारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यापुढे सोमवारी गोदावरी प्रगट दिनाच्या औचित्यावर बस्ते यांनी सविस्तर पणे सादर केले. यावेळी याचिकाकर्ता गोदावरी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी, गोदाप्रेमी राजेश पंडित, निशिकांत पगारे, अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री, क्षीरसागर आदी उपस्थित होते. उच्च न्यायालयाने निकालात दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये अहवाल सादरीकरणानंतर तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे नमूद केले आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गोदावरीला नैसर्गिक प्रवाह कसा उपलब्ध करून देता येईल तसेच प्राचीन कुंड व उपनद्या, नाले पुनर्जीवित करण्याबाबत अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची ग्वाही कृष्ण यांनी शिष्टमंडळाला दिली.
गोदावरीचे प्राचीन कुंड काँक्रिटमुक्त करण्यासाठी आयुक्तांना साकडे
By admin | Published: February 06, 2017 7:32 PM