नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले असतानाच सदर कामकाजावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक नाशकात दाखल झाले आहे. प्रभागरचनेत कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा गैरप्रकार होऊ नयेत यावर पथक लक्ष ठेवणार आहे.महापालिकेने प्रारूप प्रभागरचनेच्या कामकाजाला सुरुवात केली असून त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. दि. ७ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती मान्यतेसाठी शासनाला पाठविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नगररचना विभागाच्या अभियंत्यांमार्फत गूगल नकाशाद्वारे प्रगणक गटाद्वारे सीमांकन करण्याचे काम सुरू आहे. प्रभागरचनेचे संपूर्ण कामकाज गोपनीयरीत्या हाताळले जात आहे. प्रभागरचनेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये तसेच गैरप्रकार घडू नये याकरिता कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निरीक्षण पथक नेमले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अतुल जाधव आणि सहायक अधिकारी सुर्वे हे नाशकात दाखल झाले आहेत. सदर पथकाने कोअर कमिटीच्या सदस्यांकडून प्रारूप प्रभागरचनेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. प्रभागरचना कशी असली पाहिजे, प्रगणक गटांची जोडणी कशा प्रकारे करावी, भौगोलिक स्तरांची विभागणी कशी करावी, याबाबत पथकातील निरीक्षकांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
प्रभागरचनेवर आयोगाची नजर
By admin | Published: September 02, 2016 11:28 PM