ऋषभदेवपूरम, मांगीतुंगी (जि. नाशिक ) : माणूस गरजांसाठी निसर्गाशी छेडछाड करत आहे. साधन संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेतला जात आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या अनिष्ठ परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ माणूस आणि प्राण्यांशीच नव्हे तर निसर्गाशीही सम्यक व्यवहार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्तिनिर्माण कमिटीच्या वतीने आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांच्यासह पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, वाशिमचे आमदार राजन पाटणी आदी उपस्थित होते.राष्ट्रपती जैन परंपरेबद्दल म्हणाले, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण ही तीन रत्ने जैन परंपरेत आहेत. तीर्थंकरांनी धर्माला पूजा-पाठ यातून बाहेर काढत त्याला व्यवहार आणि आचरणात आणण्याचा मार्ग दाखवला. गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांनी आशीर्वचन देताना सांगितले, जेथे अहिंसा तेथे समृद्धी असते. साऱ्या विश्वाचे कल्याण व्हावे, ही भावना तीर्थंकरांची होती. तोच संदेश घेऊन देश पुढे जाईल.>आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदानमुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्वविद्यालयास भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. कुलाधिपती सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. ११ लाख रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दर सहा वर्षांनी हा पुरस्कार दिला जाईल.भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीचे निर्माण कार्य २०१६ मध्ये पूर्ण झाले. त्याची माहिती देणाºया ‘सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा’ ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले.
निसर्गाशी बांधिलकी हीच अहिंसा - राष्ट्रपती कोविंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:45 AM