नाशिक : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार संचालक मंडळ बरखास्तीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने अखेरीस नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी यासंदर्भात सेामवारी (दि.२२) आदेश जारी केले आहेत. या समितीचे अध्यक्ष हे सहकार विभागाचे सहआयुक्त एम. ए. अरीफ असतील, तर उपनिबंधक चंद्रशेखर बारी आणि नाशिकचेच सनदी लेखापाल तुषार पगार यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने तातडीने कारभार हाती घ्यावा आणि पुढील आदेशापर्यंत कामकाज सुरू ठेवावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले हेाते. मात्र, तत्कालीन संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती; परंतु गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने स्थगिती उठवून रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचप्रमाणे संचालकांना तातडीने बँकेचा कार्यभार प्रशासकीय समितीकडे देण्याचे आदेश देखील दिले आहेत. त्यानंतर आता सोमवारी (दि.२२) ही समिती नियुक्ती केली.
जिल्हा बँकेच्या कारभारासाठी प्रशासकांची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 2:34 AM