सातपूर : जिल्ह्यातील बंद पडलेल्या उद्योगांची माहिती घेऊन ते बंद पडण्याची कारणे शोधून ते पूर्ववत सुरू करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, मोठे उद्योग आणण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे, शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, निमा पदाधिकारी यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय निमात झालेल्या जिल्ह्यातील आमदार आणि उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प यावेत आणि रोजगार वाढावा या ठोस मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी निमाच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सीमा हिरे, सुधीर तांबे, डॉ. राहुल अहेर, अपूर्व हिरे, नरहरी झिरवाळ आदि उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद आहेत, त्याची अशी अवस्था कशामुळे झाली याचा शोध घेऊन ते पूर्ववत सुरू करण्याची सूचना आमदार सीमा हिरे यांनी केली, तर उद्योगांना चालना मिळण्यासाठी शासनाकडून अपेक्षित योजना पदरात पाडून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी सुकाणू समिती तयार करण्याची सूचना आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केली. प्रारंभी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी जिल्ह्यात मोठे उद्योग आणण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासन दरबारी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. सरचिटणीस उदय खरोटे यांनी जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प यावेत आणि रोजगार वाढावा या ठोस मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या बैठकीत मधुकर ब्राह्मणकर, रमेश वैश्य, संजीव नारंग, मनीष रावळ, व्हीनस वाणी, संजय सोनवणे, मंगेश पाटणकर, छबू नागरे, शशिकांत जाधव, हर्षद ब्राह्मणकर आदिंनी सूचना केल्या.या बैठकीस उदय रकिबे, देवयानी महाजन, संदीप भदाणे, मोहन सुतार, मंगेश काठे, कैलास अहिरे, उत्तम दोंदे, श्रीकांत बच्छाव, सुनील बागुल, शिवाजी आव्हाड आदिंसह निमा सभासद उपस्थित होते. ज्ञानेश्वर गोपाळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
उद्योगांच्या पाठपुराव्यासाठी समिती
By admin | Published: October 01, 2016 1:31 AM