नाशिक : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दरवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करण्याकामी समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने २० जुलै रोजी घेतला आहे.या समितीचे अध्यक्ष राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव असून सदस्य सचिव म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या उपआयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीच्या अन्य सदस्यांमध्ये एकात्मिक महिला व बालविकास आयुक्त, उपसचिव, सहसचिव (नियोजन) वित्त विभागाचे उपसचिव, तसेच संघटना प्रतिनिधी म्हणून एम. ए. पाटील, आयटक बालवाडी कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी सुकुमार दामले, सीटू संघटनेच्या शुभा शमीम, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रतिनिधी भगवान देशमुख, महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक सेविका आणि मदतनीस महासंघ प्रतिनिधी राजेंद्र बावके आदिंचा समावेश करण्यात आला आहे. पंकजा मुंडे-पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार आता या समितीचे गठण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी समिती शासन
By admin | Published: July 21, 2016 12:53 AM