नाशिक : कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी राज्यभर मिशन मोडवर प्रक्रिया राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर नाशिकमध्येदेखील जिल्हा आणि तालुकापातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीचा विशेष कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर नाशिकमध्येदेखील मोहीम राबविण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेत तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यात येणार आहे. नाशिक महसूल प्रशासन जिल्हाधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचारी यांच्या समन्वयातून कामकाजाला सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानंतर नाशिक जिल्ह्यातील तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘विशेष कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुकास्तरावर संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कामकाज करणार आहे.