अशोक बिदरी
मनमाड ( नाशिक ) : देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक योजना सुरू झाल्या.मात्र मागील अडीच वर्षाच्या काळात योजना बंद पडल्या. पण सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आले अन् योजना पुन्हा सुरू झाल्या. त्याच अनुषंगाने मनमाड शहराला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता. तो प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी सातत्याने करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न माझ्याकडे मांडला. त्यानंतर मी त्यासाठी तात्काळ निधी मंजूर करत मनमाडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासह मतदारसंघातील विविध विकास कामांना प्राधान्य दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदगाव मतदारसंघातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी योजनेसह विविध सेवांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलते होते. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह उपस्थित होते.