वणी : दिंडोरी तालुक्यातून उच्चतम प्रतीची द्राक्षे गुजरात राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेनंतर आता गुजरात राज्यातून दिंडोरी तालुक्यात विविध प्रकारचे आंबे बाजारपेठेमध्ये दिसून येत असल्याने द्राक्षाच्या माध्यमातून गुजरातमधून सुरू झालेल्या अर्थप्रणालीचा प्रवाह आंब्याच्या माध्यमातून पुन्हा गुजरातकडे वळला आहे. डिसेंबर ते मे या सहा महिन्यांच्या कालावधीत गुजरात राज्यातील बिलीमोरा, भरूच, नवसारी, सुरत, बडोदा, अहमदाबादपासून गुजरात व राजस्थानच्या मध्यान्ह सीमेपर्यंत दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे विक्रीसाठी पाठविण्यात येतात. सोनाका, काळी गणेश, थॉमसन, प्लेम व तत्सम प्रकारच्या द्राक्षांचा यात समावेश असतो. गुजरात राज्यातील जनतेची जीवनप्रणाली समृद्ध असल्याने दर्जेदार वस्तूला मोल हे त्यांचे गणित आहे. त्यात व्यवहारप्रणाली पारदर्शी असल्याने द्राक्षविक्रेत्यांचा ओढा स्वाभाविकपणे गुजरातकडे असतो. डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत प्रतिदिन किमान वीस ट्रक द्राक्षे गुजरात राज्यात विक्रीसाठी तालुक्यातून जातात. सध्या द्राक्षाचा हंगाम संपल्यात जमा असून, आता आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. तालुका गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने वाहतूक, दळणवळणामुळे अंतर फार कमी झाले आहे. या व्यावसायिक प्रणालीच्या गतीस अनुसरून दिंडोरी तालुक्यातील आंबे व्यापाऱ्यांनी गुजरातची वाट धरली आहे. वणी, दिंडोरी, वरखेडा, खेडगाव या भागातील आंबे खरेदीदार वाजदा, वघई, धरमपूर, बिलीमोरा, बलसाड या मोठ्या आंब्यांच्या बाजारपेठांमध्ये आंबे खरेदीसाठी जाऊ लागले आहेत. हापूस, लंगडा, पायरी, केशर या प्रकारच्या आंब्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन गुजरातमध्ये होते. या आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. पायरी जातीच्या आंब्याला खालोखाल मागणी असते. केशर जातीचा आंबा खाणारा एक् विशिष्ट वर्ग असून, त्याची खास मागणी आगाऊ करावी लागते. सर्वात महागडा आंबा म्हणून हापूसची ओळख सर्वमान्य आहे. सुखवस्तू खरेदीदार ग्राहकांचा ओढा याकडे असतो. मे ते १५ जून असा दीड महिन्याचा कालावधी आंब्याच्या हंगामाचा असतो. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या खरेदी विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. या व्यवहारप्रणालीच्या पद्धतीबाबत नवीन ग्राहकाला उत्सुकता असते व त्याला याचे कोडेही पडते. दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष विक्रीच्या माध्यमातून व गुजरातमधील आंबे खरेदीच्या माध्यमातून एकमेकांचे व्यवसाय भिन्न असले तरी या दोन्ही व्यवसायाच्या माध्यमातून व्यावसायिक संबंधात वृद्धी झाल्याचे जाणवते आहे. दरम्यान, द्राक्ष विक्रीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असून, उलाढालही मोठी आहे. त्या तुलनेत आंब्याच्या खरेदीच्या माध्यमातून आर्थिक उलाढालीची तुलना त्या पातळीवर होत नसली तरी अर्थप्रणालीच्या प्रवाहाचा बदलता वेग या माध्यमातून होत असल्याने व्यावसायिक प्रणालीची गेल्या अनेक वर्षांपासूनची गती सातत्याने वाढताना दिसून येत आहे.
दळणवळण सुलभ : दिंडोरी तालुक्यात ‘लंगडा’ आंब्याला सर्वाधिक मागणी गुजरातमधून आंब्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:05 AM
वणी : दिंडोरी तालुक्यातून उच्चतम प्रतीची द्राक्षे गुजरात राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेनंतर आता गुजरात राज्यातून दिंडोरी तालुक्यात विविध प्रकारचे आंबे बाजारपेठेमध्ये दिसून येत असल्याने द्राक्षाच्या माध्यमातून गुजरातमधून सुरू झालेल्या अर्थप्रणालीचा प्रवाह आंब्याच्या माध्यमातून पुन्हा गुजरातकडे वळला आहे.
ठळक मुद्दे दर्जेदार वस्तूला मोल हे त्यांचे गणित आहेआंबे व्यापाऱ्यांनी गुजरातची वाट धरली