नाशिक : आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, गोरगरीब, अनाथ, निराधार कुटुंबातील मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्या पुढाकाराने राज्यभर आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जिल्हास्तरीय विवाह सोहळा १७ मे रोजी पार पडणार असल्याची माहिती प्रभारी धर्मादाय उपआयुक्त वैशाली पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ६ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रक क्रमांक ५३३नुसार सामुदायिक विवाह सोहळा समिती नाशिक जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शहर व जिल्ह्यामधील नोंदणीकृत धार्मिक, सामाजिक सेवा संस्थांच्या २१ पंचांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. यावेळी सहायक आयुक्त दीप्ती कोळपकर, के. एम. सोनवणे, समितीचे केशवअण्णा पाटील, श्रीकांत बेणी, अॅड. भाऊसाहेब गंभिरे उपस्थित होते. राज्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची संख्या अधिक असून, त्यांच्या वयात आलेल्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळा समिती स्थापन करण्यात येऊन या समितीद्वारे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ मे रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी १०१ तरुण-तरुणींचे प्रस्ताव अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, अद्याप दहा लाखांचा निधी संकलित झाल्याची माहिती बेणी यांनी दिली. या विवाह सोहळ्यासाठी गरजू, गोरगरीब सर्वधर्मीय कुटुंबातील व्यक्ती कायद्यानुसार मुला-मुलींचे वय पूर्ण असल्यास नोंदणी करू शकतात, असे पंडित यांनी स्पष्ट केले. हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, मुस्लीम अशा सर्वच धर्मांच्या परंपरेनुसार विवाह लावला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.प्रत्येक जोडप्याला अर्धा तोळे सोन्याचे मणी-मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तू व किमान १०० वºहाडींची भोजनव्यवस्था करून दिली जाणार आहे. गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
गरजू कुटुंबीयांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:08 AM