नाशिक : कला माणसाच्या विचारांना आणि मनला सुसंस्कृत करून आकार देते त्यामुळे गीत, शब्द, सूर आदी विविध कलांमुळे समाज समृद्ध होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.संस्कृती वैभवातर्फे यावर्षी सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोविंदनगर येथील मैदानावर शुक्रवारी (दि.२१) त्रिवेणी महोत्सवाच्या माध्यमातून कला क्षेत्रातील या त्रयींनी मानवंदना देण्यात आली. या महोत्सवाचे उद््घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रवींद्र देवधर, दीपक चंदे, चेतन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळे, अनिल दंडे आदी उपस्थित होते. राजदत्त म्हणाले, सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या सावलीत मी वाढलो. या तिन्ही दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देताना आकाशातील चंद्राच्या प्रकाशात आज तात्यासाहेबांचे रूपच जणू दिसत असून, या त्रयींचा स्मृती सोहळा आपल्या नयनांनी पाहत असल्याची अनुभूती आपल्याला मिळाल्याचे राजदत्त म्हणाले. चित्रपटसुष्टीची मुहूर्तमेढही येथूनच रोवली गेली.मला या तीन थोर व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांनीच मला घडवताना त्यांच्या विचार व संस्कारांतून उभे केल्याचे सागत त्यांनी सुधीर फडके, गदिमा आणि पु. ल. यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, त्रिवेणी महोत्सवाच्या स्मरणिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. हा महोत्सव दि.२३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, या माध्यमातून कलारसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया देवघरे यांनी केले. पल्लवी कुलकर्णी यांनी आभार मानले.अक्षर त्रिवेणीत अभिवाचन रंगलेत्रिवेणी महोत्सवात पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रानंतर अक्षर त्रिवेणी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात सुधीर फडके, गदिमा आणि पु. ल. देशपांडे यांच्या कला व साहित्य कृतीवर आधारित अभिवाचन करताना अभिनेता संजय मोने व तुषार दळवी यांनी महोत्सवात रंगत भरली, तर गायक अनिरुद्ध जोशी नचिकेत लेले व धनश्री देशपांडे यांनी ‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लाऊ दे रे...’,‘ एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’ नाही खर्चिली कवडी दमडी, ‘नाही वेचला दाम’ आदी विविध गीतांचे सादरीकरण केले. त्यांना संवादिनीवर प्रमोद पवार, ढोलकीवर विजय जाधव, तबला नवीन तांबट यांच्यासह अमित शर्मा, अनिल धुमाळ, मनोज गुरव यांनी साथसंगत केली.
कलेमुळेच समाज समृद्ध : राजदत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 1:30 AM