लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पामधील वाहतूकदारांनी दरवाढीसाठी पुकारलेल्या संपाबाबत तोडगा न निघाल्याने चौथ्या दिवशीही संप सुरूच होता. कंपनी प्रवेशद्वारासमोर वाहतूकदारांनी शुक्रवारी सामुदायिक मुंडण करून कंपनी प्रशासनाचा निषेध केला. संपामुळे कंपनीतून वाहतूकदारांच्या गाड्या इंधन भरून गेल्या नसल्याने इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वाहतूक दर वाढवून मिळावा या मागणीसाठी येथील वाहतुकदारांनी संप पुकारला आहे. नव्या निविदेप्रमाणे देण्यात येणारे दर हे वाहतुकदारांना परवडत नसल्याने ते वाढवून देण्याची मागणी आहे. संपाच्या चौथ्या दिवशीही दरवाढीबाबत तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच आहे. कंपनी प्रशासन वेळकाढू भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ कंपनी प्रवेशद्वारासमोर अनेक वाहतुकदारांनी सामुदायिक मुंडण केले.या वेळी कंपनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान संपामुळे या प्रकल्पातून टॅँकरद्वारे राज्यातील १४ जिल्हयामध्ये होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला असून हा संप लवकर न मिटल्यास राज्यातील अनेक पंपांवर इंधन टंचाई जाणवणार आहे. या वेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, शिवसेना शहर अध्यक्ष मयूर बोरसे, नारायण पवार, अशोक पवार यांच्यासह शहरातील प्रमुख राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून पाठिंबा दिला.
इंधन वाहतूकदारांचे सामुदायिक मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 1:17 AM