नाशिक : लघुउद्योजकांसाठी मुद्रा कर्ज उपयुक्त ठरत असले तरी त्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच पार्श्वभूमीवर लघुउद्योगांच्या कर्जासाठी कर्जदाते, उद्योग आणि मुद्रा बॅँक यांची त्रिस्तरीय भागीदारी झाली असून, त्यामुळे बॅँकाना लाभेच्छुकांची निवड करणे सोपे होणार आहे. केंद्र सरकारने आधी लहान आणि मध्यम व्यावसायिक उद्योजक आणि अगदी विक्रेते यांच्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची सुविधा दिली असली तरी अनेक अडचणी त्यासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार कर्ज दिले जाणार असून त्यामुळे मोठ्या कंपन्यांना लघु उद्योगांमार्फत आपल्या सेवा क्षेत्राचा विस्तार करता येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका व खासगी बॅँकाबरोबरच खासगी वित्तीय संस्थादेखील मुद्रा योजनेच्या व्यासपीठावर एकत्र आल्या असून दोन दिवसांपूर्वीच यासंदर्भात करार करण्यात आला आहे. करार करणाऱ्या कंपन्या मुद्रा योजनेअंतर्गत टायअप करून युवकांना कर्ज मिळवून देण्यासशठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे बॅँकांनाही कर्जवितरणाबरोबरच वसुलीचीदेखील शाश्वती मिळू शकेल. जे युवक या कंपन्यांबरोबर व्यवसाय करू इच्छित असतील त्यांना कंपन्यादेखील पत्र देतील आणि हे पत्र बॅँकांना कर्जप्रस्तावासह दिल्यास बॅँका सहज कर्ज उपलब्ध करून देतील, त्यामुळे कर्ज वितरण तर सुलभ होईलच शिवाय लाभेच्छुकांना कर्ज मिळण्यातील अडचणी दूर होतील, असे शासनाचे मत आहे.
मुद्रा योजनेसाठी कंपन्या-कर्जदारांची भागीदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:25 AM