नाशिक : मुकणे पाणीपुरवठा योजनेबाबत एल अॅण्ड टी कंपनीने ३० सप्टेंबरपर्यंत दिलेली मुदत बुधवारी (दि.३०) संपुष्टात आली. मात्र, कंपनीने अल्टीमेटम देऊनही कंपनीच्या तालावर नाचण्यास सत्ताधारी मनसेने नकार दिला असून, मुकणेप्रश्नी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी स्पष्ट केले आहे. मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा राबविण्याच्या योजनेसंदर्भात निविदाप्रक्रियेला राज्य शासनाने दिलेली स्थगिती उठविल्यानंतर सदर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. राज्य शासनाने स्थगिती उठविताना महापालिकेला कोणतीही आर्थिक झळ लागणार नाही आणि खातरजमा करूनच निर्णय घेण्याचे महापालिकेला सूचित केले होते. दरम्यान, निविदाधारक एल अॅण्ड टी कंपनीने आयुक्तांना पत्र पाठवून ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत असल्याने आणि नंतर पुढे मुदतवाढ देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे स्पष्ट केले. सदर पत्र आयुक्तांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले आणि लवकरात लवकर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रत्यक्ष निविदाधारक कंपनीनेच अल्टीमेटम दिल्याने महापौर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून होते. महापौरांनीही याबाबत विशेष महासभा बोलवून सर्वसंमतीने निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु ३० सप्टेंबरची मुदत संपूनही महासभा न झाल्याने मुकणे पाणी योजनेच्या भवितव्याबाबत चर्चा केली जात असतानाच महापौरांनी सदर कंपनीच्या तालावर नाचण्यास नकार दिला आहे. महापालिका नियमानुसारच कामकाज करेल. कोणताही निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही. सर्वसंमतीनेच निर्णय घेतला जाईल, असे महापौर अशोक मुर्तडक यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या तालावर नाचण्यास नकार
By admin | Published: September 30, 2015 11:49 PM