सिडको : मशीनमध्ये पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून अंबड औद्योगिकवसाहतीतील एका कंपनीत कामगारांमध्ये झालेल्या वादावादीतून एका कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. घटनास्थळावरून पसार झालेल्या हल्लेखार कामगारास काही तासांतच पोलिसांनी अटक केली. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंबड औद्योगिक वसाहतीत आशापुरा रबर उद्योग कंपनी आहे. या कंपनीत सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मशीनमध्ये पाणी भरण्याच्या कारणावरून ग्यानेंद्रकुमार रामसेवक वर्मा (२३, रा. पांडवनगरी मूळ उत्तर प्रदेश), व घनश्याम देवीदास मोरे (३६, रा.रामकृष्णनगर अंबड) यांच्यात वाद झाले होते. मोरे याने कंपनीतील काही कामगारांना मारहाण केल्यामुळे इतर सर्व कर्मचारी याचा जाब विचारण्यासाठी मोरे याच्याकडे गेले होते. ग्यानेंद्र यानेदेखील मोरे यास दादागिरीविषयी मोरे यास जाब विचारला होता. याचा राग आल्याने मोरे याने ग्यानेंद्र यास बाहेर बोलावून घेतले आणि रागाच्या भरात रबर कापण्यासाठी लागणाऱ्या चाकूने ग्यानेंद्रकुमार याच्या मानेवार वार केले. या हल्ल्यात ग्यानेंद्रकुमार याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित मोरे घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी मोरे याला काही तासांतच रामकृष्णनगर भागातून ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू जप्तदेखील केला आहे. रणजितकुमार वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी घनश्याम मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पवार करीत आहेत.
किरकोळ कारणावरून कंपनी कामगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:07 AM