घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.याबाबत पीकविमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ करत असल्याने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. सोमवारी (दि.२१) राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देवून साकडे घातले आहे. दरम्यान याबाबत पीकविमा कंपनीकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही भुसे यांनी दिली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०२०/२१ या वर्षासाठी खरीप हंगामाचा पीकविमा भरलेला होता. या खरीप हंगामात अतिवृष्टी होऊन भातशेतीसह अन्य पिके उध्वस्त झाली, अवकाळी पाऊस बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडून पिकांबरोबर शेतकरीही उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने व पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याबाबत तालुक्यातील शेतकरी उत्तम शिंदे, नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर कोकणे, पांडुरंग कोकणे, बाळासाहेब शिंदे, दत्तू कापसे आदींनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे याबाबतची व्यथा नमूद केली.इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने नेमून दिलेल्या भारती एक्स ! विमा कंपनी, पुणे यांच्याकडे पीकविमा काढून पिकविम्याची रक्कम भरली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले. मात्र काही गावातील अवघ्या चार पाच शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. त्यामुळे गावगावात शेतकऱ्यांकडून ओरड होत असून स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे.
शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 5:36 PM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे.
ठळक मुद्देनुकसानग्रस्तांचे कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे