न्यायडोंगरी : लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांनी पाटचारीचे काम करताना जिल्हा परिषदच्या मालकीच्या रस्त्याचे विना परवानगी खोदकाम केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हा परिषदेकडे नुकसानभरपाई म्हणून ४५ हजार रुपये त्वरित जिल्हा परिषदेकडे भरणा करावे, असे आदेश जिल्हा परिषदेकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लघु पाटबंधारे स्थानिक स्तर मालेगाव यांना दिले.सुमारे १२ वर्षांपूर्वी या चारीचे काम बेकायदेशीररीत्या केले गेले असल्याच्या तक्रारी नायडोंगरी येथील शेतकरी शंकर लक्ष्मण कोकाटे यांनी केली होती. गेल्या पाच वर्षांपासून कोकाटे यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करून लघु पाटबंधारे स्थानिक स्तर मालेगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली असता शेवटी जिल्हा परिषदेला आदेश करावा लागल्याने महाराष्ट्र शासनाच्या एका खात्याने दुसऱ्या खात्याकडे नुकसानभरपाई मागण्याचा तालुक्यातील असे पहिलेच प्रकरण असल्याने सर्वांचेच याकडे विशेष लक्ष लागले आहे. (वार्ताहर)