नाशिक : शहरात आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे बाधित झोपडपट्टीवासीयांना मदत देताना महापालिकेने पक्षपात केला होता. मात्र, आता अघोषित म्हणजे अधिकृत घोषित नसलेल्या झोपडपट्ट्यांतील बाधितानाही नुकसानभरपाई मिळणार आहे. मंगळवारी आमदार देवयानी फरांदे यांनी सचिवांची भेट घेतल्यानंतर सचिव मालिनी शंकर यांनी तसे आदेश दिले आहेत.नाशिक शहर परिसरात २ आणि ३ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. त्यामुळे गोदावारी आणि नासर्डी नदीला महापूर आला होता. महापुरामुळे गोदाकाठची अनेक कुटुंबे बाधित झाली. आमदार देवयानी फरांदे यांनी प्रशासनाची भेट घेऊन तातडीने पंचनामे करून संबंधित कुटुंबांना नुकसानभरपाई करण्यास सूचित केले होते. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही केली, परंतु ज्या झोपडपट्ट्या अधिकृत घोषित आहेत. त्यातील बाधित कुटुंबीयांनाच भरपाई देण्यात आली. मात्र अनेक झोपडपट्ट्या अधिकृत घोषित नाहीत त्यामुळे त्यातील बाधित कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. या पक्षपाती निकषांबद्दल मंगळवारी आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबईत मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव मालिनी शंकर यांची भेट घेतली आणि मनपाच्या चुकीच्या निकषामुळे मल्हारखाण, मंगलवाडी, रामवाडी, राहुलनगर, आगरटाकळी, घारपुरे घाट येथील भिलाटी, भारतनगर, शिवाजीवाडी येथील नागरिकांना मदत मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर मालिनी शंकर यांनी अशाप्रकारे निकषाच्या आधारे कोणावर अन्याय होणार नाही, असे सांगितले. इतकेच नव्हे तर दिवाळीपूर्वी संबंधितांना मदत देण्याचे आदेश यंत्रणेला दिल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अघोषित झोपडपट्ट्यांतील रहिवाशांनाही भरपाई
By admin | Published: October 26, 2016 11:39 PM