शैलेश कर्पे सिन्नरमाघ पौर्णिमेला जिल्ह्यात अनेक ठिकाणी यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत यात्रा आल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांना एकाच वेळी भेटण्याची ‘पर्वणी’ चालून आली आहे. यात्रा, उत्सव आणि आखाडे जिथे असतील तेथे उमेदवारांनी भेटी देण्याचा तडाखा लावल्याचे चित्र आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रचाराला इन मिन आठ दिवस उरले आहेत. प्रचारासाठी हाती राहिलेले मोजके दिवस लक्षात घेऊन जिथे गर्दी तिथे प्रचार हे थोरण सध्या राजकीय नेत्यांसह उमेदवारांनी जिल्ह्यात ठेवले असल्याचे दिसते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने ती मतदारांच्या भेटीसाठी पर्वणी ठरत आहे. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या अशा उत्सवाचा राजकीय नेते पुरेपूर फायदा घेत असल्याचे चित्र आहे. यात्रेनिमित्त सुरू असलेले अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचे कीर्तन, तमाशा, भारुडांचे कार्यक्रम व कुस्त्यांचा आखाडा यामध्ये जाऊन प्रचार करण्यावर मोठा भर दिला जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे. माघार सोमवारी असली तरी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म दिले असल्याने प्रमुख पक्षाचे जवळजवळ उमेदवार निश्चित झाले आहेत. माघारीनंतर तर अवघा सहा दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवार व राजकीय नेते मंडळी आत्तापासूनच प्रचाराच्या धामधुमीत लागले आहेत. उमेदवार व नेतेमंडळी लोकांपर्यंत पोहोचण्याची कोणतीच संधी सोडत नसल्याचे दिसते. धार्मिक कार्यक्रमात अनेक नागरिक एकाच ठिकाणी भेटतात अशा कार्यक्रमांना वर्गणी देण्यासह त्यात स्वत:ला मिरवून घेण्याची हौस उमेदवार पूर्ण करून घेत आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्याबरोबरच वैयक्तिक, सार्वजनिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रचार करण्याचे माध्यम प्रत्येकजण स्वीकारत आहेत. लग्नकार्य, दशक्रिया, गंधाचे कार्यक्रम, वर्षश्राद्ध, साखरपुडे, वास्तुशांती अशा कार्यक्रमांपासून यात्रेतील कुस्त्यांचे आखाडे व रात्रीच्या लोकनाट्य तमाशाचे नारळ वाढविण्याच्या कार्यक्रमासदेखील सर्व नेतेमंडळी हजेरी लावत आहेत. एकाच कार्यक्रमास सर्व पक्षांचे उमेदवार व नेतेमंडळी येत असल्याने यजमानाला मोठा मान मिळत आहे.
गर्दीत ‘पर्वणी’ साधण्यासाठी स्पर्धा
By admin | Published: February 12, 2017 10:15 PM