नाशिक : स्पर्धा परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून तरुण पिढीने इतरांशी स्पर्धा करू नये. कोण किती वेळ अभ्यास करतो, कोण कोणती पुस्तके वाचतो, याकडे लक्ष देण्याऐवजी सकारात्मक विचार ठेवून स्वत:शीच स्पर्धा करावी, असा सल्ला मराठवाड्याचे विभागीय सामान्य प्रशासन उपआयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी दिला.‘स्टडी सर्कल’च्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशाली पाटील होत्या. डॉ. योगेश भरसाठ, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, संतोष डोईफोडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. फड म्हणाले, एकाग्रता, आत्मविश्वास, सकारात्मक विचार व सातत्य हे यशाचे चार खांब आहेत. स्पर्धा परीक्षेत वशिला लागतो, हा गैरसमज आहे. कष्ट करा व यशस्वी व्हा. संमेलनात ‘मी असा घडलो’ या विषयावर डॉ. भरसाठ, सचिन हिरे, संतोष डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले तसेच टिप्सही दिल्या. आॅल इंडिया रेडिओच्या बातम्या नेहमी ऐकण्याचा सल्ला डॉ. भरसाठ यांनी दिला. ‘प्रेरणा’ या विषयावर नायब तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. विजय मराठे, शेखर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. नंदुरबारसारख्या अविकसित जिल्ह्यात राहून यश मिळू शकते, तर शहरातल्या विद्यार्थ्यांना ते का अवघड जावे, असा सवाल डॉ. मराठे यांनी उपस्थित केला. अखेरच्या टप्प्यात स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. हर्षद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला राज्यभरातून विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘स्टडी सर्कल’च्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन
By admin | Published: June 15, 2015 1:47 AM