येवला : येवला नगरपालिका आणि कापसे पैठणी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कोटमगाव येथील यात्रेनिमित्त घटी बसणाऱ्या महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या नवरात्रोत्सवात घटी बसणाऱ्या महिलांना उत्तेजन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जगदंबामाता सभामंडपात स्पर्धा घेण्यात आल्या. डोळे बांधून पोस्टरवरील महिलेच्या चित्राला टिकली लावणे, डोळे बांधून समोरच्या महिलेला कुंकू लावणे व मेकअप करणे, प्रश्नावली, संगीत खुर्ची आदि स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत योगीता जाधव, रंजना निरगुडे, गीता सूर्यवंशी,भारती सूर्यवंशी, प्रमिला लेमभे, कल्याबाई देवरे, छाया देशमुख, सुमन भावसार या विजयी स्पर्धक महिलांना कापसे पैठणी उद्योग समूहाच्या वतीने सेमी पैठणी साड्या देण्यात आल्या. स्पर्धेत असंख्य महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक उषाताई शिंदे, राजश्री पहिलवान, भारती येवले, भारती जगताप, जयश्री लोणारी, अयोध्याबाई शर्मा आदिंनी परिश्रम घेतले. दरम्यान, स्पर्धा आयोजित करणाऱ्या महिलांंचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उषाताई शिंदे यांनी केले. राजश्री पहिलवान यांनी आभार मानले.अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात याव्या, असा आशावाद उपस्थित महिलांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
घटी बसणाऱ्या महिलांसाठी स्पर्धा
By admin | Published: October 20, 2015 11:05 PM