नाशिक : बॅँकांकडून चलनी नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असताना बॅँकेत पैसे शिल्लक नसणे, नोटा न स्वीकारणे, वेळेपूर्वीच बॅँक बंद करून टाकणे अशा विविध तक्रारी शनिवारीही कायम होत्या. जिल्हा नियंत्रण कक्षात बॅँकांच्या प्रतिनिधींनी तक्रारी करण्याबरोबरच नागरिकांनीही त्यांना आलेले अनुभव कथन करून प्रशासनाकडून मदतीची याचना केली. केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी बॅँका, पोस्ट कार्यालयातून नोटा बदलून देण्याबरोबरच बॅँकेतून चार हजारापर्यंत पैसे काढण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ५२५ बॅँका व ९७ पोस्ट कार्यालयात त्यासाठी व्यवस्था करून, प्रत्येक नागरिकाला पैसे मिळतील असा दावा केला होता. प्रत्यक्षात गुरुवारपासून पैसे बदलून देण्यास व नोटा स्वीकारण्यास प्रत्यक्षात सुरुवात झाली असता, त्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारीही सकाळपासून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून या संदर्भात नियंत्रण कक्षात तक्रारी करण्यात आल्या. त्यात गॅस एजन्सीचालकाकडून पाचशेच्या नोटा न स्वीकारणे, एटीएम बंद असणे, बॅँकेने तसेच पोस्टाने नोटा स्वीकारण्यास नकार देणे, मेडिकल स्टोअर्समध्ये नोटा न घेणे, पैसे शिल्लक नसल्याचे कारण दाखवून ग्राहकांना परत पाठविणे, वाटप करताना पैसे संपणे, दहा हजारापर्यंत पैसे काढण्याची तरतूद असताना बॅँकेकडून कमी पैसे देणे अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. शनिवारचा दिवस असल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम बॅँकिंग व्यवसायावर झाल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
दुसऱ्या दिवशीही तक्रारी कायम
By admin | Published: November 13, 2016 12:04 AM