लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी संशयकल्लोळ असतानाच सत्ताधारी भाजपाच्याच एका कार्यकर्त्याने दोघा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत त्यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याने संबंधित अधिकारी चर्चेत आले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांची लाचलुचपत आणि आयकर विभागामार्फत चौकशीची मागणी पत्रात करण्यात आली आहे.पंतप्रधान कार्यालयाच्या पीजी पोर्टलवर भाजपा कार्यकर्ते नरेश नाईक यांनी तक्रार केली आहे. त्यात प्रामुख्याने, महापालिकेतील शहर अभियंता उत्तम पवार आणि भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांच्या मालमत्तांचा तपशील देतानाच संबंधितांची चौकशी करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी सदर तक्रार पीजी पोर्टलवर करण्यात आली असून, त्यातील तथ्यांश तपासून पाहूनच निर्णय घेतला जाईल आणि तसे उत्तर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. महापालिकेत सध्या तीन ते चार अधिकाऱ्यांची गैरकारभाराबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी काही अधिकाऱ्यांच्या चौकशीला होत असलेल्या विलंबाबद्दल प्रशासनाला आदेशीत केले होते. आता आणखी दोन अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आल्याने अधिकारी यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ३१ मे पूर्वी आयुक्तांकडे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या संपत्तीचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, दोनच अधिकाऱ्यांचे विवरणपत्र दाखल झाले होते. कामात कुचराई करणाऱ्या मक्तेदारांवर कारवाई केल्यामुळे अधिकाऱ्यांचे अशाप्रकारे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू असतो. परंतु अशा कारवायांना न घाबरता पारदर्शीपणे काम सुरूच राहील.- उत्तम पवार, शहर अभियंता
दोन अधिकाऱ्यांविरोधी पंतप्रधानांकडे तक्रार
By admin | Published: June 18, 2017 12:57 AM