नाशिक : आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय असले तरी या रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डाच्या परिसरात साचलेला बायोमेडिकल वेस्ट तर अनारोग्याच प्रसार करीत आहेत; परंतु गटारी फुटून आजूबाजूच्या परिसरातदेखील जात असल्याने टिळकवाडी परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली आहे.सध्या कोरोनाकाळात जिल्हा शासकीय रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी असलेला बायोमेडिकल वेस्ट अत्यंत त्रासदायक ठरत आहे. कोरोना वॉर्डातून नागरिक आपल्या आप्तेष्टांना डबे वैगेरे देत असतात, परंतु त्यांना या कचऱ्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या भागातील भटके कुत्रे हा बायोमेडिकल वेस्ट सर्वत्र पसरवत असतात. त्यामुळे कोरोनाचा सहजगत्या प्रसार होत असतो. त्यात कमी म्हणून की काय, परंतु रुग्णालयाच्या गटारी वाहत वाहत टिळकवाडी परीसरातील अपार्र्टमेंटच्या परीसरात जात असल्याने या भागात देखील आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या भागात दोन ते तीन जणांना डेंग्यू देखील झाला आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाने आता परिस्थती सुधारावी अशी मागणी होत आहे.
शासकीय रुग्णालयाच्या अस्वच्छतेबाबत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:35 AM