नाशिक : वैद्यकीय देयकांना विलंब तसेच अन्य मुद्द्यांवरून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना आयुक्ततुकाराम मुंढे यांनी थेट दोषारोप पत्र दिले आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयके दिली जातात. परंतु ती देयके वेळेत दिली जात नाही. अशी तक्रार होती. काही महिन्यांपूर्वी एका महिला शिक्षिकेचे वैद्यकीय देयक २०१६ मध्ये शिक्षण उपसंचालकांकडून मंजूर होऊनदेखील महापालिकेत अडवले गेले होते. एकूण १०३ वैद्यकीय प्रलंबित असल्याने शिक्षक संघटनेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देऊन तक्रार केली होती. मात्र त्यानंतर मुंढे यांनी त्यांना प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतरही ६५ वैद्यकीय देयकांची प्रकरणे प्रलंबित असून, त्यापलीकडे आणखी अन्य कामेही प्रलंबित आहेत. सहाव्या वेतन आयोगानुसार अनेक शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा न करणे तसेच खातेनिहाय चौकशा प्रलंबित ठेवणे अशा कामातील दिरंगाईचा ठपका उपासनी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अनेक शिक्षक संघटनांकडूनही तक्रारी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणाची देखील दखल घेण्यात आल्याने कारवाई अटळ मानली जात होती.याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
प्रशासनाधिकारी उपासनी यांच्यावर दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:41 AM