नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला मनसेचे पदाधिकारी संदीप भवर यांनी आक्षेप घेत थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सदर उपक्रमामुळे आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप भवर यांनी पत्रात केला आहे.
संदीप भवर यांनी आयोगाला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाबाबत मनपा अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नाही. आचारसंहिता काळात या कार्यक्रमाबात बॅनर, स्टेज, टेबल, खुर्च्या, ध्वनीव्यवस्था, वाहने आदी खर्च मनपाच्या तिजोरीतून केला जाऊ नये. शासकीय सुटी असून, देखील मनपा आयुक्तांकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे, शासकीय कार्यक्रम जाहीर करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, प्रशासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा जाहीर कार्यक्रम घेण्याआधी निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
निवडणूक फंडातून खर्च केलेल्या कार्यक्रमाबाबत परवानगी घेऊन हिशेब सादर करणे हे प्रशासकीय यंत्रणेचे काम आहे. वॉक विथ कमिशनर या उपक्रमांतर्गत नागरिकांवर प्रभाव पडणा-या करवाढीचे समर्थन करणे व अन्य शहरांतील करांची उदाहरणे देऊन करवाढ कशी योग्य यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचेही भवर यांनी म्हटले आहे. याशिवाय, तक्रारींसाठी मोबाइल अॅपची सुविधा असतानादेखील सत्ताधाºयांना मदत करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रम घेतले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
निवडणूक अधिका-यांकडून दिशाभूलभवर यांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आचारसंहिता काळात सुरू असलेल्या या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च झाला नसल्याचे दिशाभूल करणारा खुलासा पाठविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही आयोगाकडे करण्यात आला आहे.