नाशिकरोड : अर्ध्या वाट्याने शेती करणाऱ्या युवकाला शेतीचे पैसे न देता वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेगाव झाडे मळा येथील पुरुषोत्तम रघुनाथ आगळे या युवकाने मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या पूर्वी घराजवळील पडक्या पडवीतील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मयत पुरुषोत्तमची पत्नी छाया आगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिंदेगाव येथील शेतकरी भाऊसाहेब विठोबा देवकर यांची चार एकर जमीन अर्ध्या वाट्याने करण्यासाठी पती पुरुषोत्तम यांना दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून देवकर यांनी शेतीतून निघणाºया पिकाच्या उत्पन्नाचे पैसे दिले नाही. सोमवारी दुपारी भाऊसाहेब व त्यांची पत्नी सविता देवकर हे आमच्या घरी आले व म्हणाले की, आमची शेती करणे सोडून द्या. यावेळी पती पुरुषोत्तम यांनी विकलेल्या शेत मालाचे १ लाख ३० हजार रुपये, १० ट्रॅक्टर शेणखताचे ४० हजार व कांदा पिकासाठी ठिबक सिंचन केले त्याची आलेली सबसिडी ही अर्धी मला द्या, असे सांगितले. मात्र देवकर यांनी तुला एक पैसादेखील देणार नाही, तू शेतीचा ताबा सोडला नाही तर तुझ्या मुलाचे हातपाय तोडून टाकू, अशी दमदाटी केली. या तणावाखाली पुरुषोत्तम यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात देवकर पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकास त्रास दिल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:19 AM