नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने दीडशे कुटुंबांना मुले झाल्याचा दावा केल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे यांच्यावर अखेरीस नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या १० जून रोजी नाशिकमध्ये शिव प्रतिष्ठानच्या मेळाव्यात बोलताना, आपल्या शेतातील आंबे असून ते १८० कुटुंबांना दिले. त्यातील दीडशे दाम्पत्यांना मुलेच झाल्याचा दावा केला होता. यासंदर्भात पुणे येथील आरोग्य उपसंचालकांच्या आदेशानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या विभागांतर्गत असलेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यात भिडे यांच्या वक्तव्याची व्हिडीओ फीत बघून चौकशी केली असता सकृतदर्शनी भिडे दोषी आढळले होते. मात्र, भिडे यांनी यासंदर्भात नोटीस स्वीकारली नव्हती. दरम्यान, यासंदर्भात पुन्हा समितीची बैठक वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी व डॉ. प्रशांत थेटे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले. भिडे यांचे वक्तव्य गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम २००३ अंतर्गत कलम २२ चे उल्लंघन असल्याने त्यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आता नियमानुसार त्यावर न्यायालयाकडून भिडे यांना समन्स बजावून पुढील कार्यवाही होणार आहे. भिडे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यास तीन वर्षे कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकेल. ‘त्या’ मुलाखतीचीही दखलमध्यंतरी संभाजी भिडे यांनी टीव्ही १८ लोकमतला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आंबे प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यावर यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असून, ते न्यायालयात सादर करू, असा दावा केला होता. या मुलाखतीदरम्यान त्यांचे विधानदेखील न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:19 AM