पंचवटी विभागीय कार्यालयात सभापती शीतल माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती बैठक झाली. यावेळी बैठकीत उद्यान विभागाच्या ६५लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. बनारसीनगर भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवक पूनम मोगरे यांनी केली. पाण्याचे नमुने घेऊन खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता ते पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे निष्कर्ष निघाला तसेच प्रभागात स्वच्छता कर्मचारी वाढवून देखील अनेक भागात स्वच्छता होत नाही असे मोगरे यांनी सांगितले. पंचवटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या भागातील रहिवाशांना पाणी फिल्टर स्वच्छ करून घ्यायला सांगा अशी सूचना गुरुमित बग्गा यांनी मांडली. प्रभागात झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडून असतो तो उचलण्यासाठी विभागात किती वाहनांची व्यवस्था आहे, याची विचारणा रुची कुंभारकर यांनी केली. पंचवटीत अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे; मात्र त्याकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमण काढणार कोण असा सवाल लोकप्रतिनिधींनी व्यक्त करत अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. यावेळी झालेल्या प्रभाग बैठकीच्या चर्चेत उपमहापौर भिकुबाई बागुल, गुरुमित बग्गा, पुंडलिक खोडे, रुची कुंभारकर, प्रियंका माने, पूनम मोगरे, नंदिनी बोडके, विभागीय अधिकारी विवेक धांडे आदी सहभागी झाले होते.
प्रभाग सभेत दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:31 AM