नाशिक : अस्तित्वात नसलेल्या संघटनेने दिलेल्या पत्रावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीविरुद्ध जिल्हा रुग्णालयातील तिघा कर्मचाऱ्यांनी आरोग्य उपसंचालक डॉ़ बी़ डी़ पवार यांच्याकडे तक्रार केली असून, निवेदनही दिले आहे़ सुरगाणा येथील एकलव्य आदिवासी सामाजिक संघटनेने जिल्हा रुग्णालयातील दूरध्वनीचालक उज्ज्वला कराड या जिल्हा रुग्णालयात शासनाच्या कायापालट अंतर्गत होणाऱ्या कामकाजात बाधा आणत असून, फोनवर अपमानास्पद उत्तरे देतात़ शवविच्छेदन विभागातील कर्मचारी सरजित डिंगीया हे मृताच्या नातेवाइकांशी असभ्य वर्तन करतात तसेच आर्थिक मागणी करतात, तर चतुर्थश्रेणी कर्मचारी हिरामण मते हे कक्षात हजर राहत नाहीत त्यामुळे दुसऱ्या कक्षसेवकांना त्रास होतो, असे लेखी निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांच्याकडे दिले होते़ या निवेदनानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी या तिघाही कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे पत्र दिले होते़ या तिन्ही कर्मचाऱ्यांनी सुरगाणा येथे जाऊन एकलव्य आदिवासी सामाजिक संघटनेचा शोध घेतला असता, अशा प्रकारची कोणतीही संघटना अस्तित्वात नसल्याचे तसेच निवेदनावर स्वाक्षरी केलेल्या नावाची व्यक्ती तिथे राहत नसल्याचे आढळून आले़ तसेच अशी कोणतीही संघटना अस्तित्वात नसल्याचे पत्रही सुरगाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी या कर्मचाऱ्यांना दिले आहे़ एकलव्य नावाची कोणतीही संघटना अस्तित्वात नसताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले हे सूडबुद्धीने व हेतुपुरस्सर आपल्यावर कारवाई करीत असल्याचा आरोप कराड, मते व डिंगिया या कर्मचाऱ्यांनी केला असून, त्याबाबतचे निवेदनही आरोग्य उपसंचालक डॉ़ बी़ डी़ पवार यांच्याकडे केली आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हा शल्यचिकित्सकांची आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार
By admin | Published: December 06, 2014 1:15 AM