सिग्नलवर वाहनचालकांमध्ये बाचाबाची
नाशिक : शहरातील अनेक सिग्नलवर सिग्नल पडण्यापूर्वीच अनेक वाहनचालक पुढे निघण्याचा प्रयत्न करतात. यामुळे विरुध्द बाजूने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. काहीवेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. अनेकवेळा वाहनचालकांमध्ये बाचाबाची होते. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा
नाशिक : शहरातील मुख्य रस्त्यावर विविध वस्तू विकणारे विक्रेते दुकाने मांडत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्याने चालणेही कठीण होते. वाहतुकीसही मोठ्या प्रमाणात अडथळा होतो. वारंवार हटवूनही विक्रेते पुन्हा त्याच ठिकाणी ठाण मांडत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
मतदारांच्या संपर्कात राहण्याची धडपड
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. मतदारांशी सतत संपर्कात राहण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.
नांदुरनाका चौकात खड्डे
नाशिक : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नांदुर नाका चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. अनेकवेळा वाहने खड्ड्यात आदळतात. या परिसरातील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी परिसरातील वाहनचालकांकडून केली जात आहे.
बदलत्या हवामानामुळे चिंता
नाशिक : बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. तयार झालेल्या आणि खुडा चालू असलेल्या मालावर हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने या मालाला अपेक्षित भाव मिळतो की नाही याबात उत्पादकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात मास्कचा विसर
नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वातावरणामुळे ग्रामीण भागात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अनेक गावांमध्ये मास्क वापरण्याकडेही नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. प्रचारफेरीतही अनेक कार्यकर्ते मास्क न लावताच सहभागी होतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.