नाशिक : वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. याशिवाय यापूर्वी झालेल्या पावसानेही काही प्रमाणात पालेभाज्यांचे नुकसान झाले असल्याने, आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. मागणी कायम असल्याने सध्या कोथिंबिरीला चांगला दर मिळत आहे. सर्वसामान्यांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांत चिंता
नाशिक : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालावेत. मात्र, लॉकडाऊन करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. विशिष्ट वेळेतच बाजारपेठ सुरू ठेवल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
बाजार समित्या बंद असल्याने उलाढाल मंदावली
नाशिक : मार्च अखेरमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज मागील चार-पाच दिवसांपासून बंद असल्यामुळे या बाजारपेठांमध्ये दररोज होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांचे लेट खरिपातील कांदे काढून पडले आहेत. मात्र, बाजार बंद असल्याने त्यांना ते विकता येत नाहीत. यासाठी त्यांना बाजार समित्या सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी
नाशिक : ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. उकाड्याने त्रस्त नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. राज्य वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त ग्राहकांनी केली आहे.
भुरट्या चोऱ्यांच्या घटना वाढल्याने चिंता
नाशिक : शहरात भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना पायी चालने मुश्कील झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडूनही, त्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत असून, पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
परीक्षांबाबत पालक चिंतित
नाशिक : चालू शैक्षणिक वर्षात शाळा काही दिवस सुरू झाल्याने, आता शासन विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार, याबाबत पालकांमध्ये तर्कवतर्क केले जात आहेत. शिक्षण विभागाने याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षांबाबत काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
काही दुकानदारांकडून नियमांचे पालन
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, अनेक दुकानदारांकडून नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात असून, मास न लावता दुकानात शिरलेल्या ग्राहकाला प्रथम मास्क लावण्यास सांगितले जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या दंडवसुलीचा हा परिणाम असून, दुकानदारांना दंड केला असल्याने अनेकांनी या बाबीचा धसका घेतला आहे.
बाजार बंद असल्याने अर्थकारणाला खीळ
नाशिक : गावोगावचे आठवडेबाजार बंद असल्यामुळे अनेक गावांमधील अर्थकारणाला खीळ बसली आहे. आठवडे बाजाराच्या निमित्ताने होणारी उलाढाल मंदावली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आठवडेबाजार भरत असतो.
रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे रस्ते खोदले आहेत, ही कामे अनेक दिवस रेंगाळत असल्याने, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.