सिन्नर : उन्हाचा तडाखा आणि दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे सर्व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे. मार्च महिना सुरू होताच तालुक्याच्या ग्रामीण भागात कडक ऊन आणि दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय शाळांमध्ये सध्या परीक्षेचा कालावधी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक संघाचे नाशिक जिल्हा कार्यवाह एस. बी. देशमुख यांनी शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांची भेट घेऊन सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यास मुख्याध्यापक सक्षम अधिकारी आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी संबंधित संस्थांची परवानगी घेऊन सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती देशमुख यांनी दिली. सकाळच्या सत्रात पूर्णवेळ म्हणजे साडेपाच तास शाळा चालेल व याबाबत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. त्यामुळे तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आवाहन मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह एस. बी. देशमुख यांच्यासह एस. बी. शिरसाट, आर. डी. निकम, एस. डी. शेलार, एस. के. सावंत, आशुमती टोणपे, के. के. आहिरे, राजेंद्र लोंढे, माणिक मढवई, ए. के. कदम, दीपक ह्याळीज, डी. एस. ठाकरे, अरविंद वाघ, के. डी. देवडे, राजेंद्र सावंत आदिंनी केले आहे. (वार्ताहर)अतिक्रमण जमीनदोस्तनाशिकरोड : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी परिसरातील तीन ठिकाणचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, नगररचना विभागाचे इजाज शेख, अतिक्रमण विभागाचे नंदू गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.
सर्व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवा
By admin | Published: March 03, 2016 11:14 PM