नाशिक : नाशिकमध्ये प्रथमच आयोजित केली गेलेली एक हजार किमी सायकलिंग ब्रेव्हे सात सायकलिस्ट्सनी निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली. एकूण १२ सायकलिस्ट्सनी या ब्रेव्हेसाठी नोंदणी केली होती. यापैकी नाशिकचे आनंद गांगुर्डे यांनी केवळ ६२ तासांत नाशिक-रतलाम (मध्य प्रदेश)-नाशिक हे राष्ट्रीय महामार्ग ३ वरून एक हजार किमीचे अंतर पूर्ण केले, तर अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अॅड. दत्तात्रेय चकोर, पुण्याचे अमोल कानवडे यांनी ७४ तासांत, तर मुंबईचे सचिन भोसले यांनी ७४.५ तासांत ब्रेव्हे स्पर्धा पूर्ण केली. शुक्रवारी (दि. २२) एक हजार किमीची ही ब्रेव्हे मुंबईनाका, नाशिक येथून सकाळी ६ वाजता सुरू करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ वरून सरळ मध्य प्रदेशातील मानपूर-रतलाम आणि पुढे नामली नावाच्या गावी (जे नाशिकपासून ५०३ किमी आहे), तेथून यू टर्न घेत त्याच मार्गाने सायकलिस्ट्स नाशिककडे परतले. एकूण १००६ किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी ७५ तासांची वेळ दिलेली होती. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ब्रेव्हेच्या मार्गावर एक वाहन उपलब्ध होते. यात निखिल भावसार आणि संदीप परब यांनी पूर्ण ७५ तास सायकलिस्ट्सची देखरेख पाहिली. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या सहकार्याने डॉ. महेंद्र महाजन गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळापासून सायकलिंग ब्रेव्हे (वेळबद्ध आणि स्वावलंबी सायकॉलॉथन्स) सुरू केले आहेत. हे ब्रेव्हे आॅडेक्स इंडिया रँडेनॉर आणि आॅडेक्स क्लब पॅरिसन, फ्रान्स यांच्याशी संलग्न आहेत. पहिली २०० किमीची ब्रेव्हे एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आली होती. यानंतर डॉ. महाजन यांनी नाशिक परिसरातील विविध मार्गांवर २००, ३००,४०० आणि ६०० किमी ब्रेव्हे यशस्वीरीत्या आयोजित केल्या आहेत. या सर्व ब्रेव्हेचे मार्ग नाशिक शहरातून सुरू होत शहरातच समाप्त होणारे (रिटर्न लूप) आहेत. असा आहे एक हजार किमी ब्रेव्हेचा इतिहास आत्तापर्यंत नाशिकमधील ११ सायकलिस्ट्सनी एक हजार किमीची ब्रेव्हे पूर्ण केली असून, त्यात डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, मोहिंदरसिंग भराज यांनी २०१४ मध्ये, तर श्रीनिवास गोकुळनाथ यांनी २०१५ मध्ये, ज्ञानेंद्र शर्मा यांनी २०१६ मध्ये, तर आज आनंद गांगुर्डे, अनिल कहार, किशोर काळे, विजय काळे, अॅड. दत्तात्रेय चकोर यांनी एक हजार किमी ब्रेव्हे पूर्ण केली आहे.
सात सायकलपटूंची ब्रेव्हे स्पर्धा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:10 AM