मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून चौकशी अधिकारी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या नेतृत्वाखाली २७ मेपासून याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. रविवारी (दि.६) चौकशीला दिलेली मुदतवाढ संपुष्टात आली होती. या तक्रारीचा गुंता हा सुटता सुटत नसून दररोज नवनवीन चेहरे चौकशीसाठी समोर येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे. सुरुवातीला पाच दिवसांच्या मुदतीत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पाण्डेय यांनी शहर गुन्हे शाखेला दिले होते. मात्र, तक्रारदाराची उशिरा प्रकट होणे आणि तक्रारींमधील आरोपांचे गांभीर्य बघता मोठ्या पदांवरील शासकीय अधिकाऱ्यांची केली जाणारी चौकशी यामुळे बारकुंड यांनी आठवडाभराच्या मुदतवाढीसाठी पत्र दिले होते. पाण्डेय यांनी जनतेमध्ये याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी चौकशीकरिता पाच दिवसांची मुदतवाढ मंजूर केली होती. या कालावधीतसुद्धा चौकशी पूर्ण होऊ शकली नाही, यामुळे पुन्हा आता पाच दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या शनिवारपर्यंत (दि.१२) गुन्हे शाखेला या चौकशीला पूर्णविराम देत चौकशी अहवाल पाण्डेय यांच्याकडे सादर करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
--इन्फो--
सचिवांपासून एजंटांपर्यंत सर्वांचे जबाब
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह मंत्रालयातील अवर सचिव डी. एच. कदम, उपसचिव प्रकाश साबळे, राज्याचे प्रादेशिक परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, सहआयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह नाशिक-धुळ्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, नागपूरचे बजरंग खरमाटे, नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्यासह विविध मोटार वाहन निरीक्षक, आरटीओ एजंट आणि तक्रारदार गजेंद्र पाटील यांचे या प्रकरणात आतापर्यंत चौकशीअंती जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेे आहेत.