लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : खरीप हंगामाच्या ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी शनिवारी (दि. ८) जुलैच्या पहिल्या आठवडाअखेर तब्बल २ लाख ८० हजार ३६० हेक्टर (४३ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्यांची लागवड झाल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी दिली.दरम्यान, जूनमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात काहीशी उघडीप घेतल्याने खरीप पेरण्यांची गती काहीशी मंदावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर असून, यावर्षी त्यात काहीशी वाढ होऊन हे खरिपाचे लागवडीखालील क्षेत्र ६ लाख ८६ हजार हेक्टरपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज आहे.यंदा जूनमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाची खरिपासाठी लगबग वाढल्याचे चित्र होते. त्यामुळेच जुलैच्या पहिल्या आठवडाअखेर एकूण ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ८० हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पेरण्या झालेल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे मका पिकाचे असून, त्या खालोखाल बाजरी, भात, नागली, मूग, उडीद या पिकांची लागवड करण्यात आली आहे. खरिपाच्या ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्वाधिक दोन लाख हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. त्याखालील बाजरी, भात, सोयाबीन, नागली, भुईमूग, उडीद, मूग पिकांची लागवड होणार आहे.
पावणेतीन लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण
By admin | Published: July 09, 2017 1:07 AM