नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड निवडणूक न घेता समितीच्या चर्चेतूनच एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे साहित्य वर्तुळातून स्वागत केले जात आहे. मात्र ही प्रक्रिया कशी राबविली जाईल, ती दोषमुक्त असेल का? तिचे परिणाम सकारात्मक असतील का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. साहित्य संमेलनासारख्या मोठ्या सोहळ्याला तितक्याच ताकदीचा अध्यक्ष लाभणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याऐवजी तो सन्मानाने निवडला जावा असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यभरात यासंबंधी उलटसुलट चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवरसाहित्यक्षेत्रातील मान्यवरांनी मतेमतांतरे व्यक्त केली.घटनात्मक बदलाचे काय?महामंडळाने हा निर्णय घेतला असला तरी त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी घटक संस्था, मुख्य संस्था यांची मान्यता व पाठिंबा लागणार आहे. त्यानंतर साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडीबाबत घटना दुरुस्ती करावी लागेल. त्याला धर्मदाय संस्थेकडून अंतिम मान्यता मिळवावी लागेल. ही सारी प्रक्रिया पार पडण्यासाठी किती कालावधी लागेल हेदेखील महत्त्वाचे आहे. पण ही पद्धत लागू झाल्यास साहित्य संमेलनाची लांबलचक प्रक्रिया सुलभ होऊ शकेल.‘या’ आहेत साहित्य संमेलनातील सहभागी घटक संस्थाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पाडण्यात देशभरातील अनेक संस्थांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचे योगदान परिणामकारक असते. यात महाराष्टÑ साहित्य परिषद पुणे; मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद; मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई; विदर्भ मराठी साहित्य परिषद, विदर्भ या मुख्य संस्था व गुजरात, गुलबर्ग, गोवा, छत्तीसगड अशा दहाच्या वर संलग्न संस्था या प्रक्रियेत सहभागी असतात. या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींना एकमताने आता अध्यक्ष जाहीर करावा लागणार आहे.
साहित्य संमेलन अध्यक्ष निवड निर्णयाचे संमिश्र स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:56 AM