नाशिक : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधीपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठ या काळात बंद ठेवण्यात आल्या तर काही पेट्रोलपंपही यावेळी बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शहर वाहतूक व परगावी जाणारी एस.टी. बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. शालिमार चौकात सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध नोंदविला. कुठेही अनुचित घटना घडली नाही. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरातून फेरी काढून व्यापारी, दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. तत्पूर्वी व्यापाऱ्यांनी बंदचा अंदाज घेत दुकानांचे शटर निम्मे उघडे ठेवले, तर बंदच्या काळात अनुचित घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. शहरातील सिडको, सातपूर, भगूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, तर नाशिकरोड, पंचवटीत नियमित व्यवहार सुरू होते. एस.टी. महामंडळाने खबरदारी म्हणून पहाटेपासूनच बससेवा बंद करून ठेवली. दिवसभर एकही बस धावली नसल्याचे सांगण्यात आले. दुपारनंतर मात्र व्यवहार सुरळीत झाले.
नाशिकमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; बससेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:49 AM