नाशिकरोडला दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:19 AM2018-09-11T01:19:48+5:302018-09-11T01:20:03+5:30
पेट्रोल-डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही.
नाशिकरोड : पेट्रोल-डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य होरपळून निघाला आहे. केंद्र शासनाला पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ इंदिरा कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी, महाराष्ट नवनिर्माण सेना आदी पक्ष, संघटनांच्या वतीने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बिटको चौकातून सकाळी १०.३० च्या सुमारास राष्टÑवादी कॉँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, रमेश औटे, बाळासाहेब मते, रामू जाधव, विक्रम कोठुळे, मनसेचे साहेबराव खर्जुल, संतोष शहाणे, संतोष क्षीरसागर, भय्या मणियार, किशोर जाचक, रिना सोनार, श्याम गोहाड, अतूल धोंगडे, कॉँग्रेसचे रईस शेख, पोपटराव हगवणे, कामिल इनामदार, ज्ञानेश्वर चव्हाण, किरण लोखंडे आदिंनी शिवाजी पुतळा, देवी चौक, आंबेडकर पुतळा, सत्कार पॉर्इंट, मुक्तिधाम, वास्को चौक, मीना बाजार, गायकवाड मळा, दत्तमंदिर सिग्नलपासून बिटको चौकापर्यंत फेरी मारून व्यावसायिकांना बंद करण्याचे आवाहन केले.
प्रवाशांची झाली गैरसोय
बंदच्या काळात एसटी बसेसचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सोमवारी पहाटेपासून शहर वाहतूक व लांब पल्ल्याच्या बाहेरगावच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, कामगार आदींची मोठी गैरसोय झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकांत उतरलेल्या प्रवाशांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे बसस्थानक सकाळपासून ओस पडले होते.