नाशिक : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने गट व गणांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, ९ सप्टेंबरपर्यंत तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील गट व गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्णात नवीन नगरपंचायतींच्या निर्मितीनंतर गट, गणाच्या संख्येत घट होण्याची व्यक्त होणारी भीती निरर्थक असून, फक्त सात तालुक्यांमधील गट व गणांच्या रचनेत मोठा बदल होवून सदस्यांची संख्या मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांबरोबरच पंधराही पंचायत समित्यांचीही मुदत फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत आहे, तत्पूर्वीच नवीन सदस्यांची निवड करणे क्रमप्राप्त असल्याने त्याच्या प्रशासकीय तयारीला राज्य निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. प्रत्येक गट व गणाची पुनर्रचना तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणातही बदल होणार आहे.होऊ घातलेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांपैकी ३७ जागा म्हणजेच ५० टक्के यंदा पहिल्यांदाच महिलांसाठी राखीव राहणार आहेत, तीच परिस्थिती पंचायत समित्यांमध्ये म्हणजेच गणांच्या निवडणुकीत राहणार आहे. या गट व गण रचनेसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार असल्याने साधारणत: ४२ हजार मतदारांचा समावेश गटाच्या रचनेत करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी ९ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करावा, अशा सूचना असून, २३ सप्टेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांनी या प्रस्तांवाची छाननी करून त्यास मान्यता देणे व ५ आॅक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर गट, गणाची रचना व आरक्षणाबाबत हरकती नोंदविण्याचीही संधी उमेदवारांना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या गटांची रचना दीड महिन्यात
By admin | Published: August 20, 2016 1:36 AM