नाशिक-डेंग्यू रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून डिसेंबर महिन्यात हा आकडा साडे नऊशे पर्यंत गेल्याने महापालिकेचा धाबे दणाणले आहे. विशेषत: वडाळा आणि जेलरोड परिसरात सर्वाधिक डेंग्यू रूग्ण आढळले आहे. त्यामुळे येथील मोठ्या शासकिय आस्थापनांच्या परिसरांची तपासणी करण्यात येणार आहे. तर ज्या भागात डेंग्यू रूग्ण आढळतील त्या भागात घरभेटी देऊन डेंग्यू डासांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.१०) ही माहिती दिली. त्याच बरोबर खासगी रूग्णालयात देखील प्राथमिक तपासणीत डेंग्यू आढळल्यास आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन उपचार करावेत कराव्यात अशा प्रकारचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात डेंग्यूचा कहर कायम असून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६८ रूग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आत्तापर्यंत ९३९ रूग्ण आढळले आहेत. गेल्या जुलैनंतर डेंग्यूचे रूग्ण सातत्याने आढळत असून आता डिसेंबर मध्ये पाऊस पाणी नसतानाही रूग्ण संख्या वाढतच असल्याने नागरीकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. महापालिकेकडून पुरेशा उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी असून त्या पार्श्वभूमीवर आयुक्त गमे यांनी माहिती दिली.
शहरात सर्वाधिक रूग्ण वडाळा गाव परीसर आणि जेलरोड परीसरात असून शहरात सर्वत्र घरभेटी आणि तपासणी सुरू केली असतानाच या संवेदनशील भागांवर विशेष लक्ष दिले जात आहे. सीएनपी, नोट प्रेस तसेच कॅण्टोमेंट बोर्ड हद्दीत देखील डासांची निर्मिती होते किंवा नाही याबाबत तपासणी केली जाणार आहे. या भागात मनपाच्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध झाला तर संबंधीत यंत्रणांनीच आरोग्यबाबत योग्य ती तपासणी करून अहवाल द्यावा असे देखील सुचित केले जाणार आहे.