नाशिक : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाकडून वाटप करण्यात आलेल्या कर्जाची सक्तीने वसुलीची मोहीम महामंडळाने हाती घेतली असून, अवकाळी पाऊस व कर्जबाजारीपणामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या कर्जदारांवर महामंडळाने जप्तीची कार्यवाही हाती घेतल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.ओबीसी महामंडळाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंपूर्ण करण्यासाठी कर्जवाटप करण्यात आले आहे. या कर्जाची वेळेत परतफेड न करणाऱ्या थकबाकीदार कर्जदारांना महामंडळाकडून नोटिसा पाठविण्यात येत असून, त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला असल्याने कर्जदारांकडून कर्जफेडीस विलंब होत आहे. अशा परिस्थितीत महामंडळाकडून कर्जदारांना जप्तीच्या नोटिसा तसेच कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक कर्जदारांना दिली जात असून, त्यामुळे कर्जदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
ओबीसी महामंडळाची सक्तीची वसुली
By admin | Published: May 28, 2015 12:09 AM