येवला : येवला व अंदरसूल उपबाजार समितीत दररोज ५० ते ५५ हजार क्विंटल आवक होत आहे. कांद्याची प्रचंड आवक आणि निर्यातीचे शासनाचे धरसोडीचे धोरण यामुळे व्यापाऱ्यांना शास्वती नाही. यामुळे कांदाभावात निरंतर घसरण होत असल्याचे चित्र आहे. शासन कांद्याबाबत कधी गंभीर होणार हाच प्रश्न शेतकरी विचारू लागले आहे. बुधवारी आणि गुरु वारी केवळ सरासरी ४२० रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याची आवक दुप्पट झाली असून, निरंतर आवकेत वाढच होत आहे. यंदा भाव निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१६मध्ये दोन लाख ८३ हजार ५०१ क्विंटल आवक होऊन ६५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. जानेवारी २०१७ पर्यंत सात लाख ६२ हजार ७४२ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, केवळ ५२५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या दोन दिवसापासून येवला आणि अंदरसूल उपबाजारात तुलनेत सध्या २०० रु पये प्रतिक्विंटलची घसरण पाहून सहनही होत नाही सांगता येत नाही असे बुरे दिन शेतकऱ्यावर आल्याची प्रतिक्रि या बाजार समितीच्या आवारात व्यक्त झाली. सध्याचा लाल कांदा साठवता येत नाही. हा कांदा विकावाच लागतो. शासन कांदा प्रश्नावर लक्ष घालीत नाही. एकीकडे आवक वाढत असताना निर्यातवाढीला चालना द्यावी, निर्यातदारांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. निर्यात वाढली तर निदान सध्या कांद्याला आलेली अवकळा थांबेल. महाराष्ट्रासह भारतात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कांद्याला जोरदार मागणी आहे. नोटाबंदीचा निर्णयदेखील कांद्याला मारक ठरत आहे. येवला बाजार समितीने सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांना कांद्याची निर्यात बंद करू नये अशा आशयाचा ठराव पाठवला आहे. यात सध्याची कांद्याची वास्तव स्थिती काय आहे. याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अचानकपणे कांदा निर्यातबंदी केल्यास जिल्ह्यातील निर्यातदारांनी घेऊन ठेवलेला कांदा याला उठाव मिळणार नाही परिणामी कांदा खरेदीवर परिणाम होईल. (वार्ताहर)
कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता
By admin | Published: February 02, 2017 11:07 PM