खामखेडा : कांदा, कोबीबरोबरच टमाट्याचे उत्पादन घेणारे गाव म्हणून केवळ जिल्ह्यातच नव्हे तर इतर राज्यांमध्ये खामखेडा गावाची ओळख झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून टमाट्याच्या कोसळणाऱ्या भावामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळींब आदि नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. या परिसरातील शेतकरी डाळींब पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करीत होता. यातून चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात असे. त्याच्यातूनही शेतकऱ्यांची चांगली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीनवर्षापासून बेमोसमी अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा फटका त्यामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. चालू वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आले. परंतु सध्या मात्र कवडीमोल भावाने कांदा विकला जात असल्याने पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. कांद्यापाठोपाठ कोबीचेही भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त टमाटा पिकावर होती. (वार्ताहर)
भाव कोसळल्याने टमाटा उत्पादकांमध्ये चिंता
By admin | Published: September 30, 2016 11:37 PM