येवला : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या २५ झाली असून कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने येवलेकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाने अंगणगाव, गवंडगाव व पाटोदा या गावांच्या निमित्ताने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे.शहरात मालेगाव संपर्कातूून महिला कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यानंतर त्या मिहलेच्या कुटुंबातील बाधितांची संख्या वाढू लागली मात्र सदर मिहलेच्या संपर्कात आलेल्या उपजिल्हा रूग्णालयातील महिला परिचारीका कोरोनाबाधित सिध्द झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या परिचारीकेच्या संपर्कातील कुटुंबासह पोलिस व सर्वच आरोग्य यंत्रणेचे स्वॅब तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३ अहवाल आले, यात पुन्हा एक उपजिल्हा रूग्णालयातील 27 वर्षीय महिला परिचारिका कोरोनाबाधित सिध्द झाली. तो पर्यंत येवला शहराची कोरोनाबाधितांची संख्या नऊ झाली होती. काल, रात्री उशीरा आलेल्या ३५ अहवालात १६ अहवाल कोरोनाबाधित आल्याने मात्र आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे धाबेच दणाणले तर शहरात मोठी खळबळ उडाली.
येवल्यात बाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 6:06 PM