नाशिक : शहरातील बजरंगवाडी येथे एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आढळल्यानंतर मंगळवारी (दि.५) शहरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी रात्रीच शहराच्या दोन विविध भागात आणखी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर नाशिक शहरामध्ये सुरुवातीला बाधितांची संख्या मर्यादित होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागातून विशेषत: मालेगाव, धुळे, जळगाव तसेच मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मंगळवारी (दि. ५) सकाळी एका महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आला. मात्र, २ मे रोजीच तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील पहिला कोरोना बळी गेल्याची नोंद झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. सदरची महिला बजरंगवाडी येथील असल्याने सदरचा भाग सील करण्यात आला आहे. दरम्यान, हा भाग सील केला जात असताना रात्री उशिरा शहरात आणखी दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. गंगापूर रोडवरील निर्मला कॉन्व्हेंट परिसरात एका वैद्यकीय व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे तर दुसरीकडे २ मे रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या वृद्ध महिलेलादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 11:01 PM