त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीला आठ तास चंदनाच्या उटीचा लेप चढविल्याने देवाला शीतलता प्राप्त झाली असावी, अशी श्रध्दा भाविकांमध्ये होती. या उटीच्या वारीची बुधवारी रथ मिरवणुकीने सांगता झाली.
वरुथिनी एकादशीनंतर द्वादशीला काकडा आरती होऊन महाप्रसाद करण्यात आला.अनेक भाविक वारक-यां नी महाप्रसादावर एकादशीचा उपवास द्वादशीला सोडला. सायंकाळी ७ वाजता रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. तोपर्यंत दिवे लागण झाली होती. अनेक वारकरी भाविकांनी सकाळी उपवास सोडल्यानंतर घरी जाणे पसंत केले. काल मुक्काम करून उपवास सोडून कधी घरी जाऊ असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे बरेच भाविक उपवास सोडून गेल्याने सायंकाळी रथ मिरवणूकीस फारशी गर्दी नव्हती.
रथ श्रीनिवृत्तीनाथ मंदिरापासून सुंदरलाल मठ मार्गाने तेली धर्मशाळेपासून पाटील गल्ली, पोस्ट गल्ली
ते श्रीत्र्यंबकेश्वर मंदिरापुढे थांबून मंदिर प्रांगणात फुगड्या आदी खेळ खेळून झाल्यावर पालखी रथ मेनरोडने कूशावर्तमार्गे संत निवृत्तिनाथ मंदिरात परतला. यावेळी प्रशासकीय समितीचे सदस्य अॅड.भाऊसाहेब गंभिरे पुजारी जयंत गोसावी सच्चिदानंद गोसावी, योगेश गोसावी व्यवस्थापक गंगाराम झोले संदीप मुळाणे आदी मिरवणुकीत सामील झाले होते.