येवला : माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा शिक्षणमहर्षी स्व.माधवराव नागडेकर अण्णा शिक्षक पतसंस्था येथे संघाचे अध्यक्ष सुरेश जोरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेत शिक्षण क्षेत्रातील समस्या, विनाअनुदानित शाळांना फेरमूल्यांकन न करता अनुदान देणे,कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कोविडच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळेतील कर्मचारी अतिरिक्त करू नये,सेवाज्येष्ठता याद्या संपूर्णपणे अद्ययावत असाव्यात, सेवाज्येष्ठता धरताना सुरुवातीला नियुक्तीवेळी बीएड अर्हता असणाऱ्या व्यक्तीलाच पदोन्नती द्यावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघाची सभासद संख्या वाढवणे, तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या पाल्यांचा, पदोन्नती मिळालेल्या (मुख्याध्यापक) तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळ्या पतसंस्थेत पदाधिकारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.कार्यवाह डी. आर. नारायणे यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक स्वरूपात ऋतुजा नागडेकर, हर्षदा थळकर, आदिराज नारायणे यांचा तर नवनियुक्त प्रसेन पटेल व सुधीर आहेर यांचा सत्कार करण्यात आला.उपाध्यक्ष रवींद्र थळकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. सभेस शरद हिवाळे, बी. सी. चव्हाण, पोपट बारे, राहुल अडांगळे, राजेंद्र पाटील, सुषमा पैठणकर आदी उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:30 PM