नाशिक : शहरात सुरू असलेल्या दोनदिवसीय ज्योतिष अधिवेशनाचा रविवारी (दि.१९) समारोप करण्यात आला. या अधिवेशनामध्ये ज्योतिषशास्त्रावर आधारित विविध विषयांवर मंथन झाले. राज्यभरातून सुमारे दीडशेहून अधिक ज्योतिषविद्या शिकणारे ज्योतिष या अधिवेशनाला उपस्थित होते.ग्रामदेवता कालिका माता मंदिराच्या आवारातील सभागृहात सुरू असलेल्या या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष शंकरानंद सरस्वती यांच्या हस्ते व. दा. भट व श्री सिद्धेश्वर मारटकर यांना ज्योतिषमहर्षी या पुरस्काराने गौरवण्यात आले. सनातन संस्थेच्या ज्योतिष विशारद प्राजक्ता जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रदीप पंडित व चंद्रकांत शेवाळे यांनाही जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रदीप जाधव यांना विशेष कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सागरआनंद सरस्वती महाराज, शंकरानंद सरस्वती महाराज, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते.पहिल्या सत्रात नारायण फडके यांनी शनि-वैवाहिक विलंब, धुंदीराज पाठक यांनी-लक्ष्मीप्राप्ती, सुनील घैसास यांचे प्रश्न कुंडली या विषयांवर व्याख्यान झाले तसेच दुसऱ्या सत्रात सिद्धेश्वर मारठकर-भारत-आगामी काळ, तर दुसºया सत्रात प्राजक्ता जोशी-ज्योतिष-अध्यात्म, चंद्रकांत वाघुळदे यांनी बारावीनंतर करिअर निवड या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वसुंधरा संतान, अधिवेशनामागील भूमिका शुभांगिनी पांगारकर, स्मिता मुळे यांनी मांडली. सूत्रसंचालन श्यामला पांगारकर-वाघ, सागर गोसावी यांनी केले.
दोनदिवसीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:45 AM